आमुची वसने दे श्रीहरी
झोंबती अंगा जललहरी आमुची वसने दे श्रीहरी ! पळे पळाली, गेली घटका पुरे खेळ हा अवखळ, लटका परत जाऊ दे घरी आमुची वसने दे श्रीहरी ! जात आमुची अशी लाजरी क्षणाक्षणाने पदर सावरी सुवेश असला तरी आमुची वसने दे श्रीहरी ! जळात बुडले देह तरी हे उघडेपण मन विसरत नाही लाज सले अंतरी आमुची वसने दे श्रीहरी ! किती विनवावे, किती रडावे असेच वाटे जळी बुडावे तूच सुबुद्धी धरी आमुची वसने दे श्रीहरी !