आवडीनें भावें हरिनाम
आवडीनें भावें हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥ नको खेद धरूं कोणत्या गोष्टीचा । पति तो लक्ष्मीचा जाणतसे ॥२॥ सकळ जीवांचा करितो सांभाळ । तुज मोकलील ऐसें नाहीं ॥३॥ जैसी स्थिति आहे तैशापरी राहें । कौतुक तूं पाहें संचिताचें ॥४॥ एका जनार्दनीं भोग प्रारब्धाचा । हरिकृपे त्याचा नाश आहे ॥५॥