ऐकलात का हट्ट नवा
Aikalat Ka Hatta Nava
श्रीनिवास खारकर
ऐकलात का हट्ट नवा?
रामाला ग चंद्र हवा चंद्र हवा !
कौसल्येच्या मांडीवरती
राममूर्ति ग खेळत होती
रम्य आणखी अवतीभवती
पसरली होती ती पुनवा
खेळतखेळत खिडकी मधुनी
चंद्र पाहिला युवराजांनी
त्यास भासला दिवाच दुरुनी
चमचमणारा तो फसवा !
काय तरी हे अघटित बाई
चंद्र कसा हाताला येई
बाळ कुणाचे ऐकत नाही
महाराजांना जा कळवा !
कुणी समजवा बाळाला या
थकल्या त्याच्या तिन्ही आया
दमल्या सार्या दासी-दाया
फूल पुन्हा हे कुणी फुलवा
रामानी आकांत मांडिला
चतुर मंत्री सुमंत आला
समजाविल तो या रामाला
त्यास वाट द्या बाजूस व्हा
अहा पहा ग आरशातला
चंद्र पाहुनी राम हासला
साखर वाटा जा नगरीला
प्रजाजनांना जा हसवा
रामाला ग चंद्र दिला चंद्र दिला !