आकाशींच्या अंतराळीं
आकाशींच्या अंतराळीं तारकांना तेज चढे तुझीमाझी प्रीति जडे परसांतल्या फुलांचा वास कोनाकोनीं खुले तुझामाझा श्वास मिळे काजव्यांच्या प्रकाशांत तरुलता एक होत तुझेमाझे गळां हात दूर निळ्या शेवटांत व्योम-धरेचें मीलन तुझेंमाझें आलिंगन वारा पानांच्या दाटीत किती कोंडलासा वाटे तुझामाझा कंठ दाटे आनंदाचें दहींवर रात्र खालीं फार ढाळे अश्रू तुझेमाझे डोळे रातकिडे गीत गाती अंगाई फुलांना लागे आतां तूं-मी नको जागे !