बाळ उतरे अंगणीं
बाळ उतरे अंगणीं : आंबा ढाळतो सावली, चिमुकल्या पायांखाली सारी मख्मल सावळी. बाळ उतरे अंगणीं : खाली वाकली सायली, हातीं बाळाच्या यावींत फुलें-फुलांची डहाळी. बाळ उतरे अंगणीं : भान कशाचें ना त्याला, उंचावून दोन्ही मुठी कण्या शिंपतो चिऊला. बाळ उतरे अंगणीं : कसें कळालें चिऊला? भराभरा उतरून थवा पाखरांचा आला. धिटुकल्या चिमण्यांची बाळाभोवती खेळण चिमुकल्या अंगणाची बाळाभोवती राखण.