PrintSource

भरजरी ग पीताम्बर

Bharajari Ga Pitambar

प्र. के. अत्रे

भरजरी ग पीताम्बर दिला फाडुन
द्रौपदीसी बंधु शोभे नारायण

सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण
विचाराया गेले नारद म्हणून,
"बोट श्रीहरीचे कापले ग बाई
बांधायाला चिंधी लवकर देई"
सुभद्रा बोलली, "शालू नि पैठणी
फाडुन का देऊ चिंधी तुम्हांसी मी?"
पाठची बहीण झाली वैरिण !

द्रौपदी बोलली, "हरिची मी कोण?
परि मला त्याने मानिली बहीण
काळजाची चिंधी काढून देईन
एवढे तयाचे माझ्यावरी ऋण
वसने देऊन प्रभु राखी माझी लाज
चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज !"
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून

प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटली पाहिजे अंतरीची खुण
धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण
प्रीती जी करिती जगी लाभाविण
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्‍न