PrintSource

छत आकाशाचे आपुल्या

Chat Aakashache Aapulya

किशोर पाठक

छत आकाशाचे आपुल्या घराला, सखये
तृणांकुरांची शय्या आणिक तुझाच बाहु उशाला,
या शापित आयुष्याला
छत आकाशाचे आपुल्या घराला, सखये

गळ्यात घालुनी गळे, मिळुनी ही धुंद करू उपवने
सुरांत मिसळून सूर उलगडू दोन जिवांची मने
स्वैर मोकळे पिसाट जगूया भिरकावुनी दुनियेला
या शापित आयुष्याला
छत आकाशाचे आपुल्या घराला, सखये

साहु कशी विजने प्रियतमे, जाऊ नको परदेसी
तुझ्यावाचुनी मोडून घरटे होईन मी वनवासी
पंख नभाचे लावून उडुया, सोडून या धरतीला
या शापित आयुष्याला
छत आकाशाचे आपुल्या घराला, सखये