दारा बांधतां तोरण
दारा बांधतां तोरण घर नाचलें नाचलें; आज येणार अंगणीं सोनचाफ्याचीं पाउलें? भिंती रंगल्या स्वप्नांनीं झाल्या गजांच्या कर्दळी; दार नटून उभेंच नाही मिटायाची बोली ! सूर्यकिरण म्हणाले, घालूं दारांत रांगोळी; शिंपूं पायांवरी दंव म्हणे वरून पागोळी ! भरूं ओंजळ फुलांनी बाग म्हणे लहरून; देईन मी आशीर्वाद केळ म्हणाली हासून येरझारा घाली वारा गंध मोतिया घेउनी; सोनचाफ्याचीं पाउलें आज येतील अंगणीं ! सोनचाफ्याचीं पाउलें आज आलीत अंगणीं !