PrintSource

देह मंदिर चित्त मंदिर

Deh Mandir Chitta Mandir

वसंत बापट

देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

जीवनी नव तेज राहो, अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

भेद सारे मावळू द्या, वैर सार्‍या वासना
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना