PrintSource

गगनिं उगवला सायंतारा

Gagani Ugavala Sayantara

कवी अनिल

गगनिं उगवला सायंतारा
मंद सुशीतल वाहत वारा

हांक तुझी मज स्पष्ट ऐकुं ये
येइ सखे, ये बैस जवळिं, ये
घाल गळां मम तव कर कोमल
पसरूं दे श्वासाचा परिमल
घेईं मम हृदयांत निवारा
गगनिं उगवला सायंतारा

बैस जवळ ये, बघ ही पश्चिम
कोमल रंगीं खुलली अनुपम
ये नेत्रीं ते घेउं सांठवुनि
गालावरती गाल ठेवुनी
गगनिं उगवला सायंतारा

उदासीनता विसर जगाची
तुझाच मी, तूं माझि सदाची
विरलें हृदयांतरिं बघ अंतर
तूं आणिक मी जवळ निरंतर !
गगनिं उगवला सायंतारा