PrintSource

जन्मच हा तुजसाठी

Janmacha Ha Tujsathi

ग. दि. माडगूळकर

जन्मच हा तुजसाठी, प्रिया रे
नव्हत्या माहीत मज वेडीला जन्मांतरीच्या गाठी

मनात आला विनोद केवळ
बोलून गेले काही अवखळ
ओठी होती अल्लड बोली, आपुलकी पोटी

चुरगळली मी हिरवी पाने
सहजपणाने, अज्ञानाने
आज उमटली लालस मेंदी तळहाती, बोटी

परिहासाची विसर बोलणी
आठव होते काय लोचनी
परिचय झाला प्रणयासाठी, परिणय शुभ शेवटी