कुण्या देशीचे पाखरू
कुण्या देशीचे पाखरू माझ्या अंगणात आले त्याचे पंख परदेसी परि ओळखीचे डोळे माती कोठल्या धरेची त्याच्या नखांना लागली माया हिरवी कोणती त्याच्या उरात साठली आणि कोठले आकाश त्याने सर्वांगा माखले? कुठे पिऊन घेतले त्याने मेघांतले जळ दिली वार्याने कोठल्या त्याला चोचीतली शीळ त्याच्या लकेरीत गाणे कुण्या जन्मीचे भेटले ! माझ्या ओंजळीचे झाले मऊ घरटे राजस त्याला न्हाऊ घालावया ओला काजळ-पाऊस माझे मन त्याच्यासाठी फांदी होऊनिया झुले !