PrintSource

मला हो म्हणतात लवंगी

Mala Ho Mhanatat Lavangi

जगदीश खेबूडकर

नाव-गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापूरची
मला हो म्हणतात, लवंगी मिरची

हा डौल झोक, हा नटारंगीचा ढंग
वार्‍यावर लवते जशी चवळीची शेंग
हर घडीला नखरा नवा, डोळा हो डावा झाकुनी फेकिन नजरेची बरची

हा लाल डाळिंबी शालू पदर जरतारी
ही हिरवीहिरवी चोळी तंग भरदारी
नका पाहू न्याहाळून अशी, पडाल तुम्ही फशी, जणू मी नागीण झाडावरची

या तिखटपणावर जाऊ नका हुळहुळून
घायाळ शिकारी, हरिणी जाईल पळून
हिरव्या रानात दिसते उठून, नका घेऊ खुडुन, अहो मी पाव्हणी बारा घरची