मस्त रात्र ही मस्त पवन
मस्त रात्र ही मस्त पवन हा मस्त चंद्र हा मस्त चांदणे
धुंद या क्षणी धुंद होउनी धुंद जिवांचे धुंद वागणे
डोंगरमाथे उभे पलीकडे नदी खळखळे अशी अलीकडे
तिथेच वळत्या नदीतीरावर एक शिवालय उभे तेवढे
भवती हिरवागार किनारा हिरवळीचे ते मंद डोलणे
झुळुक चुळबुळे लाट खळखळे पाण्याखाली जाय पायरी
खुशाल भिजती त्यात पाऊले उन्मादक अन् गोरी गोरी
भिजेल म्हणुनी वस्त्र रेशमी मधेच थोडे वर आवरणे
जागे नव्हते तिसरे कोणी जागे दोन्ही जीव तेवढे
हातामधले कंकण हलके किणकिणले मग मधेच थोडे
एकान्तावर अद्भुत जादू वरून पसरली त्या चंद्राने
मध्यरात्रीचा थंड गारवा सुंदर त्यातुन रात्र चांदणी
नाजुक बोटे कणखर मनगट यांचे हरपे भान त्या क्षणी
निसर्ग निर्दय मानव दुबळा कुणी कुणाला मग सावरणे