नाचनाचुनी अति मी दमले
नाचनाचुनी अति मी दमले, थकले रे नंदलाला ! निलाजरेपण कटीस नेसले, निसुगपणाचा शेला आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाला उपभोगांच्या शतकमलांची कंठी घातली माला विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला अनय-अनीती नूपुर पायी, कुसंगती करताला लोभ-प्रलोभन नाणी फेकी मजवर आला-गेला स्वतःभोवती घेता गिरक्या अंधपणा की आला तालाचा मज तोल कळेना, सादही गोठुन गेला अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला