नदीकिनारी नदीकिनारी (२)
नदीकिनारी नदीकिनारी नदीकिनारी, ग ! इथेच घडली भेट आपुली नवप्रेमाची पहिलीवहिली हासत होत्या कुजबुजुनी या अवखळ लहरी, ग ! तुझेच कुरळे केस मोकळे सदा तयाशी करुनी चाळे वहात होता लबाड वारा पदरामधुनी, ग ! निळ्या नभांतुनी येउनि खाली ऐकत होती रात्र रुपेरी निर्मळशी अपुल्या प्रीतीची गोड कहाणी, ग ! निवांत झाले आज चहुकडे उभारले प्रीतीचे थडगे रात्र ढाळिते रोज प्रभाती अश्रुफुले वरती, ग !