PrintSource

निशिगंध तिच्या नजरेचा

Nishigandh Tichya Najarecha

इलाही जमादार

निशिगंध तिच्या नजरेचा, डोळ्यात दरवळे माझ्या
चाहूल तिच्या प्रीतीची, हृदयात दरवळे माझ्या

आभास सारखा होतो, ती आली येत असावी
झणकार पैंजणांचा त्या, कानात दरवळे माझ्या

ओठांनी ओठांवरती, मग लिहिली सुंदर गाणी
तो स्पर्श तिच्या श्वासांचा, रक्तात दरवळे माझ्या

लाजून बिलगली मजला, हलकेच म्हणाली 'सजणा'
अंकुर प्रीतीचा आपुल्या स्वप्‍नात दरवळे माझ्या