PrintSource

पत्रास कारण की

Patras Karan Ki

अरविंद जगताप

पत्रास कारण की, बोलायची हिंम्मत नाही
पावसाची वाट बघण्या आता काही गंमत नाही

माफ कर पारो मला, नाही केल्या पाटल्या
मोत्यावानी पीकाला ग नाही कवड्या भेटल्या
"चार बुकं शिक" असं कसं सांगु पोरा
"गहाण ठेवत्यात बापाला का?" विचार कोणा सावकारा
गुरांच्या बाजारी हिथं माणसा मोल नाही
मी नाही बोललो पण पोरा तू तरी बोल काही

ढवळ्या-पवळ्या माफी द्यावी तुम्हा लय पिळून घेतलं
पण कोरड्या जमीनीनं सारं पीक गिळून घेतलं
नाही लेकरा भाकर, नाही गुरा चारा
टिपूस नाही आभाळात, गावंच्या डोळा धारा
कर्जापायी भटकून शिरपा ग्येला लटकून
दारुपायी गेला असं लिवलं त्यांनी हटकून
गडी व्हता मराठी पण राजाला किंमत नाही

आई तुझ्या खोकल्याचा घुमतो आवाज कानी
नाही मला जमलं ग तुझं साधं औषधपाणी
मैलोमैल हिथं कुठं दवाखाना न्हाई
रोगर मात्र सहजासहजी कुटं बी गावतंय्‌ आई
शेतात न्हाई कामंच ते, जीव द्याया आलं कामी
माजं अन्‌ सरकारचं ओजं आता व्हईल कमी
मरता मरता कळलं हिथं शेतकर्‍या किंमत न्हाई