पवित्र तो देह
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ ॥१॥ तयाच्या चिंतनें तरतील दोषी । जळतील रासी पातकांच्या ॥२॥ देव इच्छी रज चरणींची माती । धांवत चालती मागें मागें ॥३॥ काय उरलें त्यां वेगळें आणिक । वैकुंठनायक जयां कंठीं ॥४॥ तुका ह्मणे देव-भक्तांचा संगम । तेथें ओघ नाम त्रिवेणीचा ॥५॥