PrintSource

प्रणाम हा तुम्हा जवान हो

Pranam Ha Tumha Javan

मंगेश पाडगांवकर

प्रणाम हा, प्रणाम हा तुम्हा जवान हो

हाक ऐकता उठून धावला
ना क्षणैक थांबला-विसावला
प्राण मानिला तुम्ही तृणासमान हो

क्रूर आग पेटली चहूकडे
वज्रसे तुम्ही तशातही खडे
चालले अजिंक्य हे पुढे तुफान हो

शत्रुचा विनाश पार संगरी
हेच ध्येय हाच मंत्र अंतरी
पिंजल्या उरांत रोविले निशाण हो

रक्त वाहते उरांत रोधुनी
ठेविलीत खिंड खिंड रोखुनी
चेतवील सर्व देश हे इमान हो

राष्ट्ररक्षणी तुम्ही अनिद्र हो
तुम्हीच वीरभद्र आणि रुद्र हो
या हिमालयाहुनी तुम्ही महान हो