PrintSource

ती पहा ती पहा बापुजींची

Ti Paha Bapujinchi Pran

मनमोहन नातू

ती पहा ती पहा बापुजींची प्राणज्योती
तारकांची सुमनमाला देव त्यांना वाहती

झुंजला राजासवें हा रंगला रंकासवें हा
पेटतां देहेहि आतां दिव्यता दावुनी जाती

चंदनाचें खोड लाजे हा झिजे त्याहूनही
आज कोटी लोचनींच्या अश्रुमाला सांडिती

पृथ्वीच्या अक्षांशीं लाली पृथ्वीच्या रेखांशीं लाली
चार गोळ्या ज्या उडाल्या दशदिशांना कापिताती

नांव ज्यांचें ऐकुनिया थरकली सिंहासने
ना धरी तलवार हाती हा अहिंसेचा पुजारी

सत्य मानी देव आणि झुंजला खोट्यासवें
मृत्युच्या अंतीम वेळी नांव रामाचें मुखीं

सिंधु गंगा आणि यमुना धन्य झाली अस्थिंनी
राख तुझी भारताच्या तिलक झाली रे ललाटी