तिनिसांजा सखे मिळाल्या
तिनिसांजा सखे, मिळाल्या, देई वचन तुला आजपासुनी जिवें अधिक तूं माझ्या हृदयाला. कनकगोल हा मरीचिमाली जोडी जो सुयशा, चक्रवाल हें पवित्र, ये जी शांत गभीर निशा, त्रिलोकगामी मारुत, तैशा निर्मल दाहि दिशा- साक्षी ऐसे अमर करुनि हे तव कर करिं धरिला. नाद जसा वेणूंत, रस जसा सुंदर कवनांत, गंध जसा सुमनांत, रस जसा बघ या द्राक्षांत, पाणि जसें मोत्यांत, मनोहर वर्ण सुवर्णांत, हृदयीं मी सांठवीं तुज तसा जीवित जों मजला.