त्या प्रेमाची शपथ तुला
Tya Premachi Shapath Tula
सुधीर मोघे
ज्या अनुभूतीच्या स्पर्शाने अर्थ लाभला जगण्याला
त्या प्रेमाची शपथ तुला
दोन दिशांचे दोन प्रवासी, एका ठायी का आलो?
हात गुंफुनी दोन घडी का घोट चांदण्याचे प्यालो?
काय तोडण्यासाठी सखये धागा धागा जोडियला?
त्या प्रेमाची शपथ तुला
सहवासातील खोटे रुसणे
अबोल्यातले ते झुरणे
मौनामधुनी मोहरणारे अहेतुकाचे ते हसणे
त्या हसण्याची त्या रुसण्याची त्या झुरण्याची शपथ तुला
मनोगतांची अधुरी गीते
मनोरथांची नि:श्वसिते
ती वचने त्या आणा-शपथा सारे का फसवे होते
त्या श्वासांची त्या गीतांची त्या शपथांची शपथ तुला