उधळित शतकिरणां
उधळित शतकिरणां उजळित जनहृदयां
नभात आला रे प्रभातरवि उदया
तिमिराची रजनी गेली रे गेली लया
थरकति चंचल जललहरी नटली सजली वसुंधरा
मधुमय मंगल स्वरलहरी चढल्या भिडल्या दिगंतरा
धिं धिं धिं ता धिं धिं धिं ता दुंदुभीच्या नादासंगे
अंबराच्या मंदिरात मंद्र वाजे सनई
जय जय बोला जय जय बोला कोटि कोटि कंठांनी
भारताच्या भविष्याच्या पहाटेच्या समयी
रे संपली ती शर्वरी
ये हा रवी या अंबरी
चल करी वंदन नवयुवका, गगनी विलसे नवा रवी
तुजसी न बंधन कधी पथिका दिसली तुजला दिशा नवी
दिडदिडदारा दिडदिडदारा प्राण आता झंकारती
तारुण्याच्या सामर्थ्याला कारुण्याची साथ दे
या भूमीला आकाशाचे आशीर्वाद लाभावे
पौरुषाला विक्रमाचे वैभवाचे हात दे
ही प्रार्थना ही कामना
ही भावना ही अर्चना