अवचिता परिमळु
Avachita Parimalu
संत ज्ञानेश्वर
अवचिता परिमळु, झुळुकला अळुमाळू ।
मी ह्मणु गोपाळु, आला गे माये ॥१॥
चांचरती चांचरती बाहेरी निघालें ।
ठकचि मी ठेलें काय करूं ॥२॥
मज करा कां उपचारूं अधिक ताप भारूं ।
सखिये सारंगधरू मज भेटवा कां ॥३॥
तो सांवळा सुंदरू कांसे पीताम्बरू ।
लावण्य मनोहरू देखियेला ॥।४॥
भरलिया दृष्टि जंव डोळां न्याहाळी ।
तव कोठें गेला वनमाळी गे माये ॥५॥
बोधोनी ठेलें मन तंव जालें अने आन ।
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये ॥६॥
बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा ।
तेणें काया मने वाचा वेधियेलें ॥७॥