घरदिव्यांत मंद तरी
GharDivyat Mand Tari
ना. घ. देशपांडे
घरदिव्यांत मंद तरी
बघ, अजून जळते वात;
उजळल्या दिशा, सजणा,
न कळतांच सरली रात !
झाडतां झडेना या
लोचनांतली पण धुंद.
सर्व रात्रभर निजला,
जिवलगा, कळींत सुगंध !
जवळपास वाटेनें
सुभग चालली कोणी :
वाजतें तिच्या भरल्या
घागरींतलें पाणी.
निवळलें, तरी दिसतो
पुसट एक हा तारा;
बघ, पहाटचा सुटला
मधुर उल्हसित वारा !
उगिच हासतें माझें
ललित अंतरंग, सख्या !
उमलल्या फुलांमधले
हालले पराग, सख्या !
झोप तूं : मिठीमधला
अलग हा करूं दे हात;
उलगडूं कशी पण ही
तलम रेशमाची गांठ?